Saturday, 8 March 2014

नवा दाखवाया , इतिहास ……


छळ बलात्कार ! व विनयभंग !
वासनेचा भोग ! तुझ्या नावे !!

मनोरंजनाचे ! झाली तू साधन !
अंती जळतन ! तुझ्या नावे !!

बा… तुझा वापर ! शरीर भोगण्या  !
 काटे व टाचण्या ! तुझ्या नावे !!

उठ आता उठ ! संघर्ष कराया !
नवा दाखवाया ! इतिहास !!

हाती तलवार ! लढलीया झाशी !
ना झालीया दाशी ! दुष्मनांची !!

मुलास बांधून ! पाठीवर राणी !
इंग्रजास पाणी ! पाजलेया !!

राज्य संकटात ! धावुनी आल्यात !
अहिल्या ताफ्यात ! स्त्रियासह !!

कालीराम जसा ! अचंबित झाला !
अहिलेस आला ! बा … शरण !!

सुनिता झालीया ! अंतराळ वीर !
मल्लेश्वरी शूर ! जगती या !!

सावित्री घेता तू ! लेखणीस हाती !
स्त्री शिक्षण क्रांती ! घडवली !!

घडतो शिवबा ! जिजाऊ मुळेच !
दिसे त्यामुळेच ! बा… स्वराज्य !!

करुणेची देवी ! दुर्गा जगदंबा !
अत्याचारी खंबा ! तू तोडावा !!

आई होऊनिया ! घर सांभाळशी !
देश सांभाळशी ! शस्र घेता !!

स्व: रक्षणासी ! तू व्हावी जागृत !
तोडूनी विकृत ! हिंसाचारा !!

तूच आहे तुझी ! शिल्पकार जगी !
बाकी आहे ढोंगी ! गा… बाजार !!

आई आत्या आजी ! बहिण वहिनी !
जीवन संगिनी ! व मुलगी !!

नाते तुझे जसे ! तू तसे जपसी !
माउली जपसी ! बंधने तू !!

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ……….
(अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर . 

Friday, 7 March 2014

भक्तांचिया मर्जी , चाले पांडुरंगा ………. 

भक्ताचीया भक्ती ! पांडुरंग ठायी !
भक्त गाथा गायी ! आवडीने !!

भक्तांचिया मर्जी ! चाले पांडुरंगा !
भोळ्या पांडुरंगा !! आदेशती !! 

पांडुरंग माझा ! सखा जिवलग !
आहे नातलग ! अंतरीचा !!

पांडुरंग हरी ! हरी पांडुरंग !
आहे अंतरंग ! पांडुरंग !!

बोला पांडुरंग ! पांडुरंग बोला !
हरी हरी बोला ! पांडुरंग !!

पांडुरंग नामी ! सुखाचा हा शोध !
समाधान बोध ! एकमात्र !!

(अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर 

Thursday, 6 March 2014

जसा प्राण साथी , देहास हो …


गजानन रूप ! ब्रम्हांड स्वरूप !
सत्य समरूप ! बा… समर्थ !!

समर्थ माउली ! उन अन सावली ! 
भक्तास गावली ! वेळोवेळी !!

आम्हा तुझा वर्ग ! गुरुकुल आहे  !!
शिकवण आहे ! ब्रम्हापरी !!

बा… फणसापरी ! गोड आतून तू !
बाह्य कठोर तू ! स्वभावात !!

पावलोपावली ! बाबा आम्हा साथी !
जसा प्राण साथी ! देहास हो !!

स्वामी उपदेश ! एकत्रित जन !
एकतेचे धन  ! बा … अमुल्य !!
(अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर