Tuesday, 28 October 2014

विठ्ठला का असा ! रुसला भक्तास !
भेटावे तू आस ! जगण्यास !!

नेमिला प्रवास ! जाणिला प्रवास !   
भक्ती हा प्रवास ! मोक्षप्राप्ती !!



Monday, 27 October 2014

मथला 

श्रावणाला सर्दी वाढत आहे 
आठवांची गर्दी वाढत आहे. 

- प्रवीण बाबूलाल हटकर 

Sunday, 28 September 2014

……. जिद्द माझी ……
गझल

हो ! पुन्हा बघ धावण्याची जिद्द माझी …
हारताना जिंकण्याची जिद्द माझी …

ह्या मनाने त्या मनाशी एक व्हावे
माणसांना जोडण्याची जिद्द माझी …

मज तुझ्या या आठवांची साथ व्हावी
श्रावणाला रडविण्याची जिद्द माझी …

शांततेला बोलताना पाहिले जर
मग मुक्यांना ऐकण्याची जिद्द माझी …

हसवितो सार्या जगाला विदुषका तू
आज तुजला हसविण्याची जिद्द माझी …

-प्रवीण बाबूलाल हटकर

Friday, 5 September 2014

आठवा हरवल्या…

आठवा हरवल्या, आठवा हरवल्या
कोठे निघू शोधाया , वाटा ह्या हरवल्या … 

पातळ भू-गर्भात, या खोल सागरात,
उंचशा अंबरात, या गाव शिवारात ,
उठलेला भवरा, गुंतुनिया स्वतात … १

आठवा हरवल्या, आठवा हरवल्या
कोठे निघू शोधाया , वाटा ह्या हरवल्या …

उत्तरामध्ये प्रश्न , या प्रश्नात उत्तर
लपंडाव श्वासात , दिपू कसे अंतर
जसे हरिणी पोटी , कस्तुरीचे अत्तर … २

आठवा हरवल्या, आठवा हरवल्या
कोठे निघू शोधाया , वाटा ह्या हरवल्या …

कासावीस दिसली , आठवांची नगरी
रे हाक पारव्याची , उदासीन लहरी
ना भेटी राजा राणी , हा एकांत जहरी … ३

आठवा हरवल्या, आठवा हरवल्या
कोठे निघू शोधाया , वाटा ह्या हरवल्या …

एकांताचा प्रवास , रे एकटा एकांत
जगण्या मरण्याला , हवा अता सुखांत
सुख दुःखाच्या डोही , 'मी' सहज निवांत …

आठवा हरवल्या, आठवा हरवल्या
कोठे निघू शोधाया , वाटा ह्या हरवल्या …

-प्रवीण बाबूलाल हटकर

   

Wednesday, 27 August 2014

आभाळा आभाळा… 

भावगीत … 

आभाळा आभाळा ये दाटुनी जरा …
भिजव अंबर  चिंब वसुंधरा …. 

आभाळ गर्भात, विजाडती कळा 
बहरे उदरी , सागराचा मळा
हालचाली आत, प्रसवता तळा … 
 
आभाळ आभाळ ये दाटुनी जरा …. 


भिजव शिखर भिजव शिवार 
भिजव पहाट भिजव दुपार 
पाखरांसवे करू चिंब विहार  … 

आभाळ आभाळ ये दाटुनी जरा …. 

आम्हा लपेटून , भिजव तू  जरा 
दोघे होऊ एक, मिटून अंतरा 
मी तुझा गुलाब तू माझी मोगरा … 

आभाळ आभाळ ये दाटुनी जरा …. 
भिजव अंबर  चिंब वसुंधरा ….

-प्रवीण बाबूलाल हटकर . 

Tuesday, 15 July 2014

समाधान आहे ,बा … विठ्ठल …


विठ्ठला तू कसा ! ओळखावा सांग !
ओळखावा कसा ! सांग देवा !!

झाडा झुडपात ! दरी वा खोऱ्यात !
पातळ नभात ! या अंबरी !!

सांग देवा सांग ! समुद्र अथांग !
पर्वतात थांग ! आहे तुझा !!

कण ब्रम्हांडात ! दृश्य अदृष्यात !
का दुजा विश्वात ! थांग तुझा !!

रे गाव शिवार !  राज दरबार !
 कोठे कारभार ! सांग देवा !!

विठ्ठल हसले ! हसत बोलले !
बोलता वदले ! ऐक भक्ता !!

मज ओळखण्या ! नको जाऊ दूर !
बा… पंढरपूर ! घर तुझे  !!

आई वडिलांची ! तू सेवा अर्पावी !
सेवा तू करावी ! मनोभावे !!

दारी भिक्षुकास ! दानधर्म करा !
मन साफ जरा ! ठेउनिया !!

दिन-दुबळ्याची ! मदत करावी !
ना तया करावी ! अव्हेलना !!

मी मिळेल तुला ! मदत म्हणून !
बा सेवा म्हणून ! हो मिळेल !!

मी मिळेल तुला ! तुझ्याच अंतरी !
अदृश्यच जरी ! जाणवेल !!

मी मिळेल तुला ! तुझ्या कार्तुत्वात !
बा… सत्य कार्यात ! सहजच !!

जाणुया तै  नाम ! घडे चारीधाम !
 आहे एकनाम ! "समाधान" !!

विठ्ठल नामात ! समाधान आहे !
समाधान आहे ! बा … विठ्ठल !!

पांडुरंग बोला ! बोला हरिनाम !
हरी हरी नाम ! पांडुरंग !!

(अभंग … )
- प्रवीण बाबूलाल हटकर 

Friday, 4 July 2014

  मुक्तक …

नको,
मला तुझी साथ,
चंद्र , सूर्य, तार्यांसारखी ,
कधी दिवसा तर कधी रात्री,
अर्ध्यावर सोडून जाणारी…

ती
हवी मज,
हवे सारखी,
अदृश्यतेतही,
श्वासाश्वासात जाणवणारी,
श्वासा-श्वासास फुलवणारी …. !!!

-प्रवीण बाबूलाल हटकर