Friday, 28 February 2014

मराठी मराठी ! माउली मराठी !


मराठीच आई ! जणू विठलाई  !
भाषा नवलाई ! महाराष्ट्रा !!

आम्हास मराठी ! आहे भू- अंबर !
विजयी गजर ! स्वराज्याचा !!

मराठी जिजाई ! मराठी रमाई !
जन्म देती आई ! बा… मराठी !!

मराठी ही भाषा ! बोलण्यास गोड !
अंकुरती मोड ! त्या परिस !!

लोखंडाचे सोने ! करितो परिस !
भाषेत परिस ! हो ! मराठी !!

बोलाल तशी ती ! वळते मराठी !
बा… आहे मराठी ! लवचिक !!

जाणाल जेव्हडी ! बा… तेव्हडी खोल !
भावना सखोल ! भाषेत या !!

मराठीची जान ! मराठीचा मान !
आहे अभिमान ! मराठीचा !!

कोहिनूर जसा ! आहे हिर्यांमध्ये !
तशी भाष्यांमध्ये ! बा… मराठी !!

नसानसात हि ! रगारगात हि !
श्वासाश्वासात हि ! भिनलेली !!

रंगतो दंगतो ! जागतो जाणतो !
बा… आम्ही  जगतो ! मराठीत !!

ना झुकेल कधी ! मराठी पगडी !
उभारून गुडी ! अंतरित !!

मराठी भाषेच ! जया ज्ञान आहे !
तै सन्मान आहे ! मराठीचा !!

मराठी मराठी ! माउली मराठी !
होऊ या मराठी ! एकरूप !!
(अभंग … )
-प्रवीण बाबूलाल हटकर


No comments:

Post a Comment